
मागील अनेक महिन्यांपासून भोसे येथे बीएसएनएल च्या टॉवरला नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर पोर्ट करत आहे. परंतु ज्या कंपनीकडे नंबर पोर्ट केलाय. त्या देखील मोबाईल कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक व शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. बीएसएनएल कंपनीने मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी भोसे व परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहेत.
भोसे येथे बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्क ला वारंवार पाठपुरावा करून देखील रेंज नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत . परंतु बीएसएनएलने जणू इतर मोबाईल कंपन्यांकडून चिरीमिरीचे संबंध प्रस्थापित केले की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. काही महिन्यापूर्वी बीएसएनएलची उत्कृष्ट मोबाईल सेवा मिळत असल्याने व चांगली इंटरनेट सर्व्हिस मिळत असल्याने अधिकांश लोकांनी बीएसएनएलचे नवीन सिमकार्ड घेतले तर काहींनी आपले आयडिया, वोडाफोन, जिओचे नंबर बीएसएनएलमध्ये परिवर्तित करून घेतले. परंतु मागील काही दिवसांपासून बीएसएनएलने ग्राहकांचे वांधे करून ठेवले आहे. मोबाईल ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी या हेतूने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले.
अधिकारी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी मोबाईल टॉवर्स शोभेची वस्तू बनले आहे. ग्राहकांची तक्रार किंवा फोनवर सूचना दिली तर त्यांची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आज घडीला मोबाईल कंपन्यांच्या भरोशावर हजारोच्या संख्येत असलेले मोबाईल धारक अवलंबून आहेत. परंतु याच मोबाईल कंपन्याकडून नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने खोळंबा निर्माण झाला आहे.
याबाबत संबंधित मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक व व्यवस्थित सुविधा मिळावी यासाठी तातडीने उपाय योजना करुन बीएसएनएल मोबाईल कंपनीचे नेटवर्क अविरत मिळेल अशी सेवा देण्याची आग्रही मागणी केली जात आहे.






