
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मंगळवार दि. २६ जून २०२४ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक न्याय दिन म्हणून आजचा दिवस महाराष्ट्रभर पाळला जातो. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
यानिमित्त मराठी विभागाचे प्रा. सुखदेव कोल्हे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. शिक्षण, शेती, सहकार, उद्योग, जातिभेद निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, कला, क्रीडा आदि क्षेत्रात शाहू महाराजांनी अद्वितीय कार्य केले आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांनंतर शाहू महाराजांनी लोकाभिमुख राज्यकारभार केल्याचे नमूद केले. कोल्हापूरला विविध जाती धर्मीयांच्या विद्यार्थ्यांसाठी तेवीस वसतिगृहे उभारली. कोल्हापूरला कुस्तीचे काशी बनविले. राधानगरी धरण बांधून कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडविली. कोल्हापूर संस्थानांमध्ये मागासलेल्या जाती-जमातींसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, महात्मा फुले यांच्यानंतर सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. सत्यशोधक चळवळीच्या अधिवेशनातच पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापण्याची घोषणा केली होती. राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक मानले जाते. लोककल्याणकारी, मानवतावादी, कलाप्रेमी, कार्यसम्राट अशा बिरुदावल्या शाहू महाराजांना वापरल्या जात असल्याचे सांगितले.
या जयंती उपक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले






