समर्थ विद्यालयाचे पावसाळी कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश 17 वर्षे वयोगट व 19 वर्षे वयोगटात समर्थ विद्यालय तालुक्यातून सर्वप्रथम व जिल्हा निवड

0
149
Google search engine

 

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कर्जत तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय मुलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत येथे दिनांक 2 व 3 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते.

भव्य दिव्य चित्ररथ व त्याच्या पाठीमागे तालुक्याभरातून आलेल्या सर्व खेळाडूंची जंगी मिरवणूक काढून खेळाडूंना वाजत गाजत विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आले. यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला. उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, तालुका कर्जत क्रीडा अधिकारी श्रीमती प्रियंका खिंडरे, समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव राऊत, समाज प्रबोधन संस्थेच्या निरीक्षिका उषा राऊत, बाळासाहेब साळुंखे, सुभाषचंद्र तनपुरे, अशोक खेडकर, दत्तात्रय नेवसे, विजूकाका तोरडमल, अक्षय राऊत तसेच माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काही प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटामध्ये अंतिम सामना श्री विठ्ठल विद्यालय, माहिजळगाव व श्री जगदंबा विद्यालय, राशीन या दोन संघांमध्ये झाला. यामध्ये श्री विठ्ठल विद्यालय, माहिजळगाव या विद्यालयाचा संघ अंतिम विजेता ठरला. या सामन्याचे पंच म्हणून पांडुरंग सातव, शहाजी हराळे, अमित तोरडमल व दादा खुरंगे यांनी काम पाहिले.

सतरा वर्षे वयोगटाचा अंतिम सामना समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत व श्री विठ्ठल विद्यालय, माहिजळगाव या दोन संघांमध्ये झाला. यामध्ये समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत या विद्यालयाचा संघ अंतिम विजेता ठरला. या सामन्याचे पंच म्हणून किशोर पवार, अजित वडवकर, भरत तांबे, दिलीप लोंढे यांनी काम पाहिले.

19 वर्षे वयोगटाचा अंतिम सामना समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत व पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबिकानगर या दोन संघांमध्ये झाला. यामध्ये समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जतचा संघ अंतिम विजेता ठरला. या सामन्याचे पंच म्हणून दादा गदादे, भरत तांबे, किशोर पवार व अमित तोरडमल यांनी काम पाहिले.

दोन दिवसीय या स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरंगे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ हे उपस्थित होते. यावेळी विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व ट्रॉफीचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव राऊत हेही उपस्थित होते.

या स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जतचे प्राचार्य श्री चंद्रकांत राऊत, क्रीडाशिक्षक विलास तोरडमल, पल्लवी भांडवलकर व विद्यालयाचा सर्व शिक्षक वृंद तसेच चंद्रभामा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतराम सूर्यवंशी व त्यांचा सर्व स्टाफ त्याचबरोबर कर्जत तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष भरतजी तांबे, उपाध्यक्ष बापू सुरवसे, पांडुरंग सातव, खजिनदार दत्तात्रय वायाळ, सचिव दादा गदादे, कबड्डी महासंघाचे कार्याध्यक्ष अजित वडवकर, जिल्हा क्रीडा महासंघाचे सदस्य नामदेव शिंगाडे, माजी जिल्हा संपर्कप्रमुख कैलास सुपेकर, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल भापकर व शहाजी भोसले यांनी केले तर आभार संपत बावडकर यांनी मानले.