गोमय उत्पाद दिनानिमित्त मंत्रालयात राशीनच्या गोशाळेचा स्टॉल

Google search engine

 

 

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या माध्यमातून 30 एप्रिल (अक्षय तृतीया) हा दिवस “गोमय उत्पाद दिन” म्हणून साजरा करण्यात आला.

त्यानिमित्त मुंबई मंत्रालय येथे राज्यभरातील १२ गोशाळेंची निवड करण्यात आली होती. यामध्ये राशीन येथील यशोदानंद गोशाळेचा समावेश करण्यात आला होता.

राज्यभरातील अनेक गोशाळा स्वावलंबी करण्याच्या उद्देशातून गोमय मूल्यवर्धन या गोसेवा आयोगाच्या उपक्रमाअंतर्गत अक्षय तृतीया (30एप्रिल) हा दिवस गोमय उत्पाद दीन म्हणून राज्य शासनाने जाहीर केला. गोमय वस्तूंचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशातून राज्य शासनाने हा निर्णय घेतला त्यानुसार राज्यभरामध्ये विविध बस स्थानक, बाजारपेठेच्या ठिकाणी गोमय वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुंबई मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्राणांगणामध्ये गोमय वस्तूंचे काही निवडक स्टॉल लावण्यात आले होते. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री शेखरजी मुंदडा यांचे विशेष सहकार्य याकरिता लाभले.

प्लास्टिकला पर्याय उपलब्ध म्हणून शेणगोमूत्र यापासून राखी, दिवे, तोरण, लटकन, शुभ लाभ, लक्ष्मी चरण, धूप, कृष्णमूर्ती, गणेश मूर्ती, लक्ष्मी, विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, स्वामी समर्थ अशा विविध प्रकारच्या गृह उपयोगी वस्तू या गोशाळेच्या माध्यमातून बनविण्यात येतात. याचीच दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने या गोशाळेस संधी दिली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यांच्या स्टॉलला भेट दिली. शेणापासून बनविण्यात आलेल्या विविध मूर्ती, तोरण, लटकन, लक्ष्मी चरण पाहिल्यानंतर त्यांनी पूजेसाठी खास देवघरात ठेवण्याची वस्तू असल्याची सांगत कार्याची प्रशंसा केली.

यावेळी गृह ,कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम अशा अनेक विभागाच्या सचिव तसेच विविध अधिकाऱ्यांनी गोमय उत्पादनविषयी माहिती घेत खरेदी केली.

राशीन सारख्या छोट्याशा गावामध्ये सुरू करण्यात आलेल्या यशोदानंद गोशाळेच्या या यशाबद्दल कर्जत तालुक्यासह परिसरामध्ये मोठे कौतुक केले जात आहे.