कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताह निमित्त कॉपीमुक्त अभियानाची शपथ 

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मंगळवार दि.२१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य विभागातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी शारदाबाई पवार सभागृह येथे कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताह निमित्त कॉपीमुक्त अभियानाची शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेतील स्वतःला आलेले प्रसंग विद्यार्थ्यांना विशद केले. तसेच बारावीची परीक्षा ही जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून प्रत्येकाने त्यासाठी धैर्याने व शांतचित्तेने सामोरे जावे. पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे, त्यासाठी कोणते तंत्र वापरावे, तसेच उत्तर पत्रिकेमध्ये मुद्द्यांची मांडणी कशाप्रकारे करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य त्याप्रकारे परीक्षेला सामोरे जावे, परीक्षेमध्ये गैरमार्ग केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीवही याप्रसंगी विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरवापर करणार नाही, याबाबतची कॉपीमुक्त अभियानाची शपथ प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.

प्रा. श्री. सुनील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट व उत्तर पत्रिकेच्या वरती असणाऱ्या सूचनांचे वाचन करून दाखवले व सदर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमांमध्ये कु. वैष्णवी घोडके, कु. सिद्धी मांढरे, कु. भाग्यश्री घालमे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश दळवी, आभार प्रा. वसंतराव आरडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. किरण भोसले यांनी केले.