
सातारा जिल्ह्यातील एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रियांका गजानन गोरे या आज शिक्षण क्षेत्रात आपले नावलौकिक निर्माण करत आहेत. त्या गोरे सर्स एज्युकेशन अकॅडमी च्या संचालिका आहेत तसेच साईराज सामाजिक संस्था, सातारा च्या सक्रिय सदस्य आहेत. आज अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालय यांसारख्या प्रतिष्ठित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देशसेवेसाठी घडत आहेत. मात्र, या यशामागे एक संघर्षाची कहाणी आहे, जिचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचा प्रवास अपूर्ण राहील.
शिक्षण क्षेत्रात प्रवेश
प्रियांका मॅडम यांचे पती गजानन दत्तात्रय गोरे पेशाने इंजिनीअर, हे आधी जाहिरात क्षेत्रात कार्यरत होते. मात्र, शिक्षण क्षेत्रात काहीतरी भरीव करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलटरी स्कूल आणि अन्य स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यावर काम सुरू केले. त्यांच्या या स्वप्नात प्रियांका यांनीही आपली साथ दिली.
सातारा सोडून पुण्यात आल्यावर त्यांनी निवासी पद्धतीची शैक्षणिक अकॅडमी सुरू केली. येथे विद्यार्थी पूर्णपणे तयार होतील, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, हे दोघांनीही ठरवले होते. परिश्रम, निष्ठा आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल व इतर प्रतिष्ठित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांची अकॅडमी नावारूपाला आली आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी दाखल होऊ लागले.
आव्हानांचा सामना
जेव्हा सर्वकाही सुरळीत सुरू होते, तेव्हा अचानक त्यांच्या जीवनात एक मोठे संकट आले. वाढत्या स्पर्धेमुळे, एक जणांनी म्हणजेच त्यांच्या भागीदाराने त्यांच्या यशाला खोडा घालण्यासाठी एक खोटी केस दाखल केली आणि गजानन गोरे सरांना यात अडकवण्यात आले. अकॅडमीच्या संपूर्ण जबाबदाऱ्या अचानक प्रियांका मॅडम यांच्यावर आल्या.
एका स्त्रीसाठी, विशेषतः दोन लहान मुलांची जबाबदारी सांभाळून, पूर्ण अकॅडमीचे व्यवस्थापन करणे सोपे नव्हते. परंतु त्यांचे पती गजानन यांनी त्यांच लग्न झाल्यानंतर मार्केटमधील अनुभव घेण्यासाठी त्यांना दोन तीन ठिकाणी काम करून अनुभव घ्यावा यासाठी कामाला पाठवले परंतु तोच अनुभव यावेळी उपयोगी आला व त्यांनी हार मानली नाही. संपूर्ण स्टाफला सोबत घेत, पालकांचा विश्वास जिंकत त्यांनी अकॅडमीचा कारभार अधिक जोमाने सांभाळला. त्यांच्या जिद्दीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावरच, १७० विद्यार्थ्यांमधून 2 विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी, 46 विद्यार्थी सैनिक स्कूलसाठी आणि 5 विद्यार्थी जवाहर नवोदयसाठी निवडले गेले.
संघर्षात कुटुंबाचा आधार
या कठीण काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते. त्यांचे सासू-सासरे, त्यांची मुलगी आणि भाऊ-नणंद, यांनी मानसिक व भावनिक आधार दिला. या पाठबळामुळेच त्या अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकल्या.
सामाजिक कार्याची जोड
यशाच्या वाटेवर जाताना त्यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला. आपल्या पतींच्या सामाजिक कार्याला पुढे नेत त्यांनी गरजू महिलांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
– वृक्षारोपण आणि अन्नदान कार्यक्रम राबवले.आपल्या अकॅडमीमध्ये दरवर्षी 2-3 गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी दिली जाते.
प्रेरणादायी विजय
आज प्रियांका गजानन गोरे यांचा संघर्ष केवळ त्यांचा विजय नसून, तो प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. संकटे आली तरी कधीही हार मानू नये, जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास यश नक्की मिळते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.
त्यांचा हा प्रवास हा केवळ एक यशोगाथा नसून, समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा आहे. महिलांनी केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर समाजासाठीही मोठे योगदान द्यावे, हा संदेश त्यांच्याकडून मिळतो.
संघर्ष कितीही मोठा असला तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश हमखास मिळते!
प्रियांका गजानन गोरे
संदेश
“यश कधीच एका रात्रीत मिळत नाही. संघर्ष, त्याग, मेहनत, आणि अपयशाचा सामना करूनच माणूस मोठा होतो. पण जर मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर काहीही अशक्य नाही!”
प्रियांका गजानन गोरे यांनी केवळ स्वतःसाठीच नाही, तर समाजासाठीही मोठं योगदान दिलं आहे. त्यांचा हा प्रवास एक प्रेरणादायी संदेश आहे— विशेषतः महिलांसाठी, ज्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे.







