
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या दरम्यान कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मैदानी स्पर्धा, फणी गेम्ससह सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून व वाणिज्य विभाग उद्योजकता विकास केंद्रामार्फत ‘ट्रेड फेअर’चे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. यामध्ये एकूण ५० स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. यामध्ये आरोग्यविषयक स्टॉल, फॅशन डिझाइनिंग स्टॉल, शेती उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, फळे, भाजीपाला, रसवंती गृह, विविध सेंद्रिय उत्पादने, शोभेची फुलझाडे, रोपवाटिका, गृह सजावट वस्तू, एम्ब्रोयडरी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, ज्वेलरी, मोबाईल ॲक्सेसरीज, ब्युटी अँड वेलनेस, स्टेशनरी, फॅशन डिझाईन, इलेक्ट्रॉनिक वस्तू , गांडूळ खत अशा विविध प्रकारचे स्टॉल उभारले गेले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी, पालकांनी खरेदीसाठी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. हजारो रुपयांची उलाढाल या स्टॉलमध्ये झालेली आहे.
या ‘ट्रेड फेअर’चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ट्रेड फेअर बरोबरच विविध फनी गेम्सचे आयोजनही करण्यात आले होते. त्याचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. या वेगवेगळ्या कला व क्रीडा स्पर्धांमुळे महाविद्यालयातील वातावरण उत्साहवर्धक बनले होते.







