“कॉम्प्रिहेन्सिव्ह इंग्लिश ग्रामर अँड कम्पोझिशन” या डॉ. निलेश हुमे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Google search engine

 

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या चर्चगेट येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. निलेश हुमे यांनी लिहिलेल्या “Comprehensive English Grammar & Composition” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. अदिती सावंत यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलसचिव प्रा. डॉ. विलास नांदवडेकर, इंग्रजी विभाग प्रमुख आणि रुसा चे वरिष्ठ सल्लागार प्रा. डॉ. पांडुरंग बरकले, उपप्राचार्य प्रा. प्रज्ञा खैरमोडे आणि वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. अर्चना मेश्राम यांची उपस्थिती लाभली.

 

प्रा. डॉ. निलेश हुमे यांच्या या पुस्तकात शालेय, महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा व्याकरण आणि लेखनकौशल्याचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या नियमांचे सुलभ स्पष्टीकरण, उदाहरणे, सराव प्रश्न, उत्तरलेखन पद्धती आदींचा समावेश यात करण्यात आला आहे.

 

या प्रसंगी कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर यांनी डॉ. हुमे यांचे कौतुक करताना “विद्यापीठाच्या अधीन असलेल्या महाविद्यालयांसाठी या पुस्तकाच्या काही प्रती उपलब्ध करून देण्याचा विचार करावा” अशी मोलाची सूचना केली.

 

प्राचार्य प्रा. डॉ. अदिती सावंत यांनी आपल्या मनोगतातून लेखकाच्या परिश्रमाचे कौतुक करताना, “लेखकासाठी पुस्तक म्हणजे स्वतःच्या लेकरासारखे असते. डॉ. हुमे यांनी अपार मेहनत घेऊन हे पुस्तक घडवले आहे” अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन केले.

 

कार्यक्रमात प्रा. डॉ. पांडुरंग बरकले यांनी आपल्या भाषणातून डॉ. हुमे यांचा जीवन प्रवास मांडला आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. प्रज्ञा खैरमोडे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून पुस्तकाच्या उपयुक्ततेचे महत्त्व विशद केले आणि लेखकास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका प्रा.अर्चना मेश्राम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा. डॉ. निलेश हुमे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य प्रा. डॉ. अदिती सावंत यांना दिले आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. हमीदा झरीवाला यांनी केले.