डॉ.ए. बी. चेडे साहेब यांच्या कार्यकर्तुत्वास अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मानाचा मुजरा 

Google search engine

 

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी  अशोक सूर्यवंशी 

कर्जत तालुका आणि विशेषत: मिरजगावच्या राजकारणात समाजकारणात आणि शैक्षणिक कार्यात ज्याचे कार्य गगनाला गवसणी घालणारे आहे व त्याबाबत ज्याचे नाव आदराने घेतले जाते असे कर्मयोगी म्हणजे डॉ. आदिनाथ बाबुराव चेडे.

डॉ.ए.बी.चेडे यांचा जन्म १० मार्च १९४० रोजी मिरजगाव येथे झाला. यांचे प्राथमिक शिक्षण मिरजगाव येथे व माध्यमिक ते विज्ञान शाखेच्या पदवी पर्यंतचे शिक्षण अहमदनगर येथे आणि वैद्यकीय शिक्षण नांदेड येथे झाले.१९६६ मध्ये मुंबई येथे वैद्यकीय व्यवसायात नोकरी सुरू केली. ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील शेतकरी असलेले वडील कै. बाबुराव चेडे यांच्या आग्रहास्तव मिरजगाव येथे १९६७ पासून वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली. व्यवसायाच्या माध्यमातून जनसंपर्क व त्यातूनच परिसरातील जनतेच्या अडचणीशी ते परिचित झाले . माध्यमिक व त्यापुढील दर्जेदार शिक्षणाची सुविधा मिरजगाव शहरासारख्या ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून १९७२ मध्ये मित्रमंडळीच्या मदतीने रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. जागा,इमारत, मान्यता,अशा अनंत समस्यांना तोंड देत आजचे भव्य दिव्य शिक्षण संकुलाचे बीज त्यानी रोवले. १९८४ मध्ये जन आग्रहास्तव डॉ.चेडे साहेब यांनी ग्रामपंचायतची उमेदवारी केली व निवडूनही आले.निस्वार्थ, समाजसेवी स्वभावामुळे सरपंचपद त्यांच्याकडे चालून आले. त्यांच्या १५ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी मिरजगावात मैलाचा दगड ठरावित अशी अनेक कामे उभी केली . समाज हिताची तळमळ व शिस्तप्रियता यामुळे त्यांचे राजकीय जीवन आदर्शवत आहे.

डॉ.ए. बी. चेडे साहेब यांच्या कार्याचा संकलित आलेख मांडायचा म्हटल तर तो खालील प्रमाणे सांगता येईल.

२६ वर्ष ग्रामपंचायत सदस्य व त्यातील १५ वर्षे सरपंच,कर्जत तालुका खरेदी विक्री संघ सलग २० वर्ष चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,सेवा सहकारी सोसायटी संचालक, सीना परिसर सहकारी पतसंस्था संस्थापक व संचालक, जगदंबा सहकारी साखर कारखाना संचालक,नगर अर्बन को ऑप. बँक १० वर्ष संचालक, अहमदनगर जिल्हा काँग्रेस आय उपाध्यक्ष, रुरल एज्युकेशन सोसायटी संस्थापक मानद सचिव व विद्यमान अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण विभागाच्या ‘वनश्री’पुरस्काराने’सन्मानित.

आपल्याला एक शाब्बासकीची थाप पाठीवर पडण्यासाठी हजारो संकटांचा सामना करावा लागतो. डॉ.चेडे साहेबांच्या हातून समाजाच्या उन्नतीची हजारो कामे झाली, त्यासाठी त्यांना अनंत संकटाशी सामना करावा लागला मात्र हाती घेईल ते तडीस नेईन अशा स्वभावमुळे त्यांनी कधीही माघार घेतली नाही.डॉ. चेडे साहेबांचा स्वभाव जिद्दी असल्याने त्यांनी डोंगराएवढे कार्य उभे केले आहे. खरे तर आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचा परिचय सांगणे एवढ्याशा ओळीत शक्य नाही मात्र प्रसिद्धीपासून दूर,जिद्दी,अभ्यासू, ज्ञानयोगी व कार्याने *कर्मयोगी* तसेच समाजाच्या भल्यासाठी अहोरात्र धडपडणारा तपस्वी असे नक्कीच म्हणता येईल.

डॉ. ए.बी.चेडे साहेबांच्या ८५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तसेच रुरल एज्युकेशन सोसायटीच्या नूतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव, महात्मा फुले नूतन महाविद्यालय मिरजगाव, अंबिका विद्यालय खांडगाव, न्यू इंग्लिश स्कूल अंबीजळगांव, कै.ना.बा. बनकर विद्यालय सांगवी भुसार या सर्व शाखातील कर्मचाऱ्यांच्या वतीने अनंत शुभेच्छा!!!