
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या कल्पकतेतून व महिला सबलीकरण कक्ष व तेजश्विनी मंचच्या वतीने ‘माझी आई माझ्या महाविद्यालयात’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांतीनिमित्त हार्दिक कुंकवाचा कार्यक्रमही यानिमित्ताने महाविद्यालयात आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या आईंना महाविद्यालयाचा सुशोभित परिसर दाखविण्यात आला. बोलकी झाडे, एनसीसी विभाग व एनसीसीची शिस्त, शारदाबाई पवार सभागृह, सर्व सायन्स लॅब, मुलींचे वसतिगृह, कॅन्टीन, ग्रंथालय, अभ्यासिका आदि कॉलेजमधला परिसर पाहून कार्यक्रमासाठी आलेल्या महिला भारावून गेल्या. कॉलेजचा परिसर म्हणजे नंदनवनच आहे, अशा नंदनवनामध्ये आमच्या कन्या सुरक्षित आहेत याचे आम्हाला समाधान आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया उपस्थित महिलांमधून व्यक्त झाल्या.
प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून हा कार्यक्रम घेण्यामागील भूमिका विशद केली. संस्कृतीची पूजक महिला असते. मुलांना घडविणारी आई असते. आजपर्यंत या महाविद्यालयात वीरमाता, वीरपत्नी, गंगा , तेजश्विनी महोत्सव, मुलींसाठी समुपदेशपर मार्गदर्शन कार्यशाळा आदी उपक्रम यशस्वी केले आहेत.
याप्रसंगी जयश्री पांडुरंग धांडे, प्रतिभा विजय शिंदे, विनया बाहुबली दोशी, सारिका श्रीकांत कदम या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयामध्ये उपस्थित झालेल्या सर्व महिलांचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, तेजस्विनी मंचच्या समन्वयक डॉ. माधुरी गुळवे व सहकारी प्राध्यापिका यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.







