
दादा पाटील महाविद्यालयामध्ये डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाच्या आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘अभिजात भाषेचे साहित्य आणि वाचक’ या विषयावर डॉ. राजाभाऊ भैलुमे यांच्या व्याख्यानाचे आयोजन भाषा, सांस्कृतिक व ग्रंथालय यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते
डॉ. भैलुमे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितले की, जे साहित्य सर्वांना समजते ते साहित्य सर्वोत्तम साहित्य असल्याचे महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. वाचनाने प्रेरणा निर्माण होते. साहित्यातून जगण्याचा अर्थ कळतो. जीवनमरणाचा प्रश्न असतात त्याला दुःख मानावे. बोली भाषेतील साहित्य बहुजनांनी स्वीकारले आहे व तेच खरे अभिजात साहित्य आहे. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे. साहित्य निर्मितीचा आनंद वेगळा असतो. साहित्य लेखनातील ग्रहणशक्ती वाढवा. साहित्यामधून व्यथा वेदना मांडता येतात. आनंदी जीवन करण्यासाठी अवांतर वाचनाची गरज आहे. वाचनाने मनुष्य घडतो, पुस्तक माणसाला शहाणे बनवते, त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजे. मराठीतील बोली भाषेत सर्वात चांगले साहित्य लिहिले गेले असल्याचे मत त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, पुस्तकांनी अनेकांना बळ दिले आहे. पुस्तक वाचनाने आयुष्याची दिशा बदलते. बरं वाचण्यापेक्षा खरं साहित्य वाचा. पुस्तकाच्या रूपाने परिस लाभला की माणसाचे सोने होते. समतेचा विचार संत साहित्यातून दिला गेला आहे. वाचन मनातून मेंदूत उतरले पाहिजे असा सल्ला त्यांनी या कार्यक्रमानिमित्त दिला.
डॉ. राजाभाऊ भैलुमे हे दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी आई-वडिलांच्या नावे ५० हजार रुपयांची कायम ठेव ठेवली आहे. या रकमेच्या व्याजातून बी.ए परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाणार आहे
या महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा डोके यांनी तर आभार प्रा. सुखदेव कोल्हे यांनी मानले






