लोकप्रतिनिधींच्या श्रेय वादामुळे कर्जतचा विकास खुंटला: सचिन सटाले

Google search engine

 

मतदार संघात आ.राम शिंदे व आ.रोहित पवार हे दोन आमदार असताना देखील कुठल्याही प्रकारे विकासाची कामे होताना दिसत नाहीत. विकास कामांऐवजी या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या श्रेय वादात कर्जत तालुक्याचा विकास खुंटला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत तालुकाध्यक्ष सचिन सटाले यांनी केला आहे.

त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की मागील पाच वर्षापासून कर्जत- जामखेड मतदारसंघांमध्ये विकास होण्याऐवजी श्रेयवाद सूरू झाला असल्याचे समाज माध्यमांच्या माध्यमातून दिसत आहे. तालुक्यातील बहुचर्चित तुकाईचारी उपसा सिंचन योजना, कर्जत एसटी डेपो ,कर्जत एमआयडीसी ,मतदारसंघातील रस्ते,आरोग्याच्या सुविधा, कुकडी पाणी प्रश्न तसेच कायम दुष्काळी जिरायती भागाकरता जीवनदायी ठरलेल्या सीना धरणाच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत लोकप्रतिनिधीकडून हवेत विरणारे आश्वासन दिले जात असून श्रेय वादामुळे या भागाचा विकास थांबला आहे. तालुक्याचा खुंटलेला विकास होणे अपेक्षित असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवरती राज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आवाज उठवला जाणार असल्याची माहिती सचिन सटाले यांनी यावेळी दिली .