साईकृपा कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषी संलग्न कार्यक्रम अंतर्गत योग दिन चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी साजरा केला.
शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडे गाव येथे साईकृपा कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांनी योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी कृषी दुत ओंकार थोरात , जयंत टुले,अमोल वाघसकर , अनिकेत लोंढे,अभिजित पवार , तुषार डूबे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव चे मुख्याध्यापक एम. बी. लंके , रामफळे सर , भिसे सर , जाधव मॅडम ,पांढरे मॅडम , शिंदे मॅडम आदी उपस्थित होते.
भारताने जगभरात योगाचा प्रचार केला आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाची विशेष ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१४ च्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी होते. या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.विद्यार्थ्यांस कार्यक्रम अधिकारी आर. डी.घोडके, प्राचार्य के. एच .निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले .







