
कर्जत तालुक्यातील माहीजळगाव व परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, येथे लवकरच स्वतंत्र विद्युत वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून माहीजळगाव येथे प्रस्तावित असलेले वीज उपकेंद्र मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी दिली.
सद्यस्थितीत माहीजळगाव तसेच आसपासच्या दहा ते बारा गावे व वाडी-वस्त्यांना पाटेगाव व कर्जत येथील विद्युत उपकेंद्रांवरून वीजपुरवठा केला जात आहे. मात्र कर्जत विद्युत केंद्र अंतर्गत १६ ग्रिड कार्यरत असून ते सर्व ओव्हरलोड अवस्थेत चालू आहेत. यामुळे अनेक गावांना वेळेवर आणि नियमित वीजपुरवठा मिळत नाही. परिणामी शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे, तसेच नागरिकांनाही वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन भाजपाचे तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी माहीजळगाव परिसरात स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारण्याची ठोस मागणी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सभापती राम शिंदे यांनी माहीजळगाव येथे ABD (एशियन डेव्हलपमेंट बँक) अंतर्गत प्रस्तावित ५ एमव्हीए क्षमतेचे सब स्टेशन मंजूर करण्यास हिरवा कंदील दिला आहे. मुंबई येथील हेड ऑफिसमार्फत या सब स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे नंदलाल काळदाते यांनी सांगितले.
या प्रस्तावित माहीजळगाव वीज उपकेंद्रामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवस-रात्र नियमित वीजपुरवठा उपलब्ध होणार असून शेती उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीही स्थिर वीजपुरवठा मिळणार असल्याने परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली माहीजळगाव परिसरातील वीजेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, ही योजना प्रत्यक्षात येताच शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे मत तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी व्यक्त केले.






