
दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे पर्यावरण जनजागृती विभाग, भूगोल विभाग आणि प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ओझोन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता कुलकर्णी यांनी केली. त्यांनी या दिनाचे महत्त्व अधोरेखित करत ओझोन स्तराच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय नगरकर यांनी मानवाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या ओझोन स्तराचे महत्त्व स्पष्ट केले. ओझोन स्तरामुळे सूर्यापासून येणारे घातक किरण रोखले जातात, यामुळे मानव, प्राणी, वनस्पती यांचे जीवन सुरक्षित राहते, असे नमूद केले.
यावेळी प्रा. अमोल तांदळे यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही केवळ शासनाची किंवा वैज्ञानिकांची नसून प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगितले. ओझोन स्तराचे महत्त्व, त्याचे मानवावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच जर हा स्तर नष्ट झाला तर उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांची माहिती त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाला भूगोल विभाग व प्राणिशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक सक्रियपणे सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आत्मसात केला. कार्यक्रमाचे आभार डॉ. माधुरी गुळवे यांनी केले तर डॉ. आशा कदम यांनी सूत्रसंचालन केले.






