
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे शैक्षणिक वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या वाणिज्य विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा श्री संत सद्गुरु गोदड महाराज रथयात्रेनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. याप्रसंगी कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य प्रा. भागवत यादव, प्रा. देविदास काळे, प्रा. वसंतराव आरडे, महेश मुंढेकर आदी मान्यवर व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले, उंच भरारी घेण्याचे स्वप्न फुलवले, आदर्शरुपी संस्कार घेतले त्या आपल्या हक्काच्या महाविद्यालयात येऊन नतमस्तक व्हावे या भावनेतून हा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. महेश मुंढेकर व श्री. गणेश खानावटे यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे आजीव सदस्यत्व स्वीकारले. तसेच महाविद्यालयाच्या गुणात्मक विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. याशिवाय अमोल जावळे, जीवन मुंढेकर, हरी ढवळे, भाग्यश्री मंत्री, सोनाली गीते, शितल गोडसे या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. वाणिज्य विभागातील ज्या प्राध्यापकांनी अध्यापनाद्वारे या माजी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केला त्या प्राध्यापकांमधून उपप्राचार्य प्रा. भागवत यादव, प्रा. देविदास काळे, प्रा. वसंतराव आरडे यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्ष मनोगतात प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले, दादा पाटील महाविद्यालय हे शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावरील अनेक पिढ्या घडविणारे महाविद्यालय बनले आहे. दादा पाटील महाविद्यालयाचा लौकिक व गुणात्मक विकास समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी उचलावी. माजी विद्यार्थी ही महाविद्यालयाची संपत्ती असते. भविष्यातील दादा पाटील महाविद्यालयाच्या वाटचालीत सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
माजी विद्यार्थी मेळाव्याचे सूत्रसंचालन स्वप्निल भंडारे यांनी तर प्रास्ताविक गणेश खानवटे यांनी केले. माजी विद्यार्थी स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. रामदास ढगे, प्रा. अभिमन्यू गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.






