सद्गुरु कृषी महाविद्यालयामध्ये कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

Google search engine

सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव मध्ये कृषी दिना निमित्त कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत पूर्ण आठवडाभर शेती संबंधित विविध घटकावर आधारित कार्यक्रम घेतले जाणार आहेत. दरवर्षी १ जुलै रोजी डॉ. वसंतराव नाईक यांची जयंती ही कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. कृषी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयामध्ये कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या कृषिदिंडीमध्ये कृषी संबंधित विविध देखावे सादर करण्यात आले. कृषी दिनाचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी दिंडीमध्ये बैलगाडीमधून डॉ. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे, संस्थेचे सचिव राजेंद्रजी गोरे सर, संस्थेचे प्रशासकीय अध्यक्ष श्री. सखाराम राजळे सर आधी मान्यवर सहभागी झाले होते. कृषीदिंडीनिमित्त काढण्यात आलेली रॅली मिरजगाव बस स्टँड ते साई मशनरी या गजबजल्या भागातून काढण्यात आली. यामध्ये ठीक ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य, घोषणा, लेझीम, दांडिया यासारख्या कला सादर करून लोकांमध्ये शेती संबंधित जागृती व आवड कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न केले.

बैलगाडी सजवून त्यामध्ये वेगवेगळी प्रबोधनात्मक भितीपत्रके लावली होती महाविद्यालयाच्या नर्सरीच्या वेगवेगळ्या रोपांची काही प्रतिनिधिक आरास ही मांडण्यात आली होती.

कृषीदिंडीच्या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रामध्ये महाविद्यालय मध्ये वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे व ती आधुनिक पद्धतीने चांगल्या प्रकारे केली तरच देश महासत्ता बनेल. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आजच्या कृषिदिनानिमित्त आपण सर्वांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक डॉ. शंकर राव नेवसे सर, संस्थेच्या अध्यक्षा सौ. कल्याणी ताई नेवसे मॅडम, सचिव राजेंद्रजी गोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डिजिटल लायब्ररी बद्दल माहिती सांगून त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले. आमचे महाविद्यालय म्हणजे कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारे आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा व आपले भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा इनामके मॅडम यांनी केले तर प्रा. मोहिनी शिंदे मॅडम यांनी आभार मानले.