दादा पाटील महाविद्यालयात महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रंथप्रदर्शन व १४ तास अखंड वाचन उपक्रम’ साजरा

Google search engine

 

दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘दि.११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५’ या कालावधीत महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे.

रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयात ‘ग्रंथप्रदर्शन व १४ तास सलग अखंड वाचन’ उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालयामध्ये करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, ग्रंथपाल प्रा. बबन कुंभार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

‘ग्रंथप्रदर्शन व सलग १४ तास अखंड वाचन’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मनोगतात सांगितले की, ग्रंथप्रदर्शनात मांडलेली विविध महापुरुषांची चरित्रे, यशस्वी व्यक्तींची आत्मचरित्रे हे विचारांचे भांडार आहे, हे ग्रंथ वाचून विद्यार्थ्यांना करिअरची दिशा मिळू शकेल. वाचनाची आवड प्रत्येकांनी स्वतःहून जोपासावी. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी व समाज वाचनापासून काहीसा दूर चाललेला भासतो आहे. १४ तास अखंड वाचन सारख्या उपक्रमांमुळे व ग्रंथप्रदर्शनामुळे वाचनाची सवय विद्यार्थ्यांना लागेल असा आशावाद प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केला.

महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. बबन कुंभार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की, पुस्तकांनी माणसाचे मस्तक घडते, ज्ञानाने, वाचनाने प्रेरणा निर्माण होते. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. याकरिता आत्मकथन, चरित्र, आत्मचरित्र, करिअर, वाणिज्य, विज्ञान, प्रशासकीय आदि विविध विषयांवरील पुस्तक वाचनाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आश्वासन व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाचे संयोजन ग्रंथालयाचे प्रा. बबन कुंभार व श्री. अनिल गांगर्डे, श्रीमती दिपाली भैलुमे, निलेश आव्हाड या सहकाऱ्यांनी केले. याप्रसंगी प्रा. सुखदेव कोल्हे, डॉ. दत्तात्रय शेंडे, डॉ. बेबी खिलारे, प्रा. वृद्धेश्वर गरुड, प्रा. अमोल थोरात, प्रा. अनिल खंडागळे, प्रा. घालमे, प्रा. तेजल बळे, प्रा. सारिका चव्हाण आदि प्राध्यापक उपस्थित होते. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील विविध विभागांचे बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होता.

इतिहास व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेण्यात आली. सोमवार दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व डॉ. जगदीश सोनवणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.