
दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व रसायनशास्त्र विभाग’ यांच्या वतीने ‘स्पर्धा परीक्षेतील संधी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे बदललेले स्वरूप’ या विषयावर अन्नसुरक्षा अधिकारी संकेत सूर्यवंशी यांचे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानसत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते
याप्रसंगी बोलताना अन्नसुरक्षा अधिकारी संकेत सूर्यवंशी यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेकरिता वेळेचे नियोजन केले तर यश मिळते. प्रामाणिकपणे व कष्टपूर्वक अभ्यास करण्याची तयारी असेलच असेल तरच स्पर्धा परीक्षांमध्ये उतरा. विविध पदांविषयी माहिती घेऊन निवड कशा पद्धतीने होते याची माहिती स्पर्धकांना असणे गरजेचे आहे. मुख्य परीक्षा, मुलाखत आदि परीक्षांच्या टप्प्यासंबंधी त्यांनी विस्ताराने मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, मनात जिद्द आणि अभ्यासात सातत्य असले की यशाला गवसनी घालता येते. परिस्थितीवर मात करून यशोशिखरावर पोहोचता येत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. संदीप गोंडके, आभार डॉ. विकास भोसले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. राम काळे यांनी मानले.







