ड्रीम्स कॉम्प्युटर, कर्जतचा एमकेसीएलकडून मानाचा सन्मान  ,  उत्कृष्ट कार्याची दखल घेत संचालक विठ्ठल धावडे सर , सौ. मोनाली धावडे मॅडम यांचा सन्मान

0
115
Google search engine

ज्ञान, तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात संगणक साक्षरतेचा प्रसार करणाऱ्या ड्रीम्स कॉम्प्युटर, कर्जत या संस्थेला महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) कडून नुकताच विशेष गौरव प्राप्त झाला आहे. या गौरवामुळे केवळ संस्थेचा नव्हे, तर संपूर्ण कर्जत तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

सन 2009 साली विठ्ठल धावडे सर आणि सौ. मोनाली धावडे मॅडम यांनी स्थापलेले ‘ड्रीम्स कॉम्प्युटर’ हे नाव आज शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह ब्रँड बनले आहे. एमकेसीएल मान्यताप्राप्त या संस्थेमार्फत गेल्या १६ वर्षांपासून एम.एस-सी.आय.टी (MS-CIT), क्लिक कोर्सेस, तसेच विविध सरकारी आणि खासगी क्षेत्रातील ऑनलाईन फॉर्म सेवा अत्यंत यशस्वीपणे राबवली जात आहे.

अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या एमकेसीएलच्या वार्षिक सभेत संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘ड्रीम्स कॉम्प्युटर, कर्जत’ या केंद्राला विशेष गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. हा सन्मान एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर पांडे सर यांच्या हस्ते विठ्ठल धावडे सर आणि सौ. मोनाली मॅडम यांना देण्यात आला. या सन्मान सोहळ्यात जिल्हा समन्वयक श्री गणेश आठरे सर व विविध मान्यवर उपस्थित होते.

 

या प्रसंगी धावडे सर म्हणाले,

“ड्रीम्स कॉम्प्युटरचा उद्देश केवळ संगणक शिकवणे नाही, तर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर आणि रोजगारक्षम बनवणे हा आहे. एमकेसीएलच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेचा आणि सुरक्षिततेचा प्रकाश पसरवत आहोत. आजच्या काळात एम.एस.सी.आय.टी कोर्सेसमधून एआय (AI) आणि सायबर सेफ्टीसारख्या विषयांवरही भर दिला जातो. हे नवे ज्ञान विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी तयार करते.”

एम.एस.सी.आय.टी अभ्यासक्रमांतर्गत आता १०० पेक्षा अधिक एआय टू (AI Tools) आधारित नवीन विषय शिकवले जात आहेत. डिजिटल साक्षरता, डेटा प्रायव्हसी, डिजिटल सुरक्षितता यांसारख्या अत्यावश्यक विषयांवर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय एमकेसीएल क्लिक कोर्सेसच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते.

सौ. मोनाली धावडे मॅडम यांनी सांगितले,

“ड्रीम्स कॉम्प्युटरने आजवर हजारो विद्यार्थ्यांना संगणक साक्षर केले आहे. अनेक विद्यार्थी आज सरकारी तसेच खासगी क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शिक्षणासोबतच आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि तांत्रिक जाण निर्माण करण्यावर भर देतो.”

एमकेसीएलला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने ‘रौप्य महोत्सव वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रांचा सत्कार करण्यात आला. त्यात ‘ड्रीम्स कॉम्प्युटर, कर्जत’चा सन्मान विशेष ठरला.

या यशाबद्दल विठ्ठल धावडे सर आणि मोनाली मॅडम यांनी आपल्या सहकारी शिक्षकवर्ग, एएलसी टीम, तसेच एमकेसीएल जिल्हा समन्वयक श्री गणेश आठरे , एमडी समीर पांडे सर आणि सर्व MKCL टीम यांचे मनापासून आभार मानले.

ड्रीम्स कॉम्प्युटरचा हा सन्मान म्हणजे ग्रामीण भागात शिक्षण आणि तंत्रज्ञान एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचे प्रतिक आहे. या केंद्राच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना संगणक आणि डिजिटल जगाशी जोडले गेले असून, अनेकांच्या जीवनात नवी दिशा मिळाली आहे.

“ज्ञानातून रोजगार, आणि शिक्षणातून परिवर्तन” — हे ध्येय बाळगून ‘ड्रीम्स कॉम्प्युटर, कर्जत’ पुढील काळातही ग्रामीण महाराष्ट्रात डिजिटल साक्षरतेचा दीप प्रज्वलित ठेवणार आहे