जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिला सन्मान सोहळा संपन्न

Google search engine

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘तेजस्विनी मंच व महिला सबलीकरण कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये ‘एकल महिला’ म्हणून श्रीमती मनीषा शांतीलाल जाधव, लंका श्रीराम पठाडे, राधिका परहर, सविता महादेव गांगर्डे, नंदा चंद्रभान शिंदे, रखमाबाई पंढरीनाथ पठाडे, शितल खराडे, संध्या दत्तात्रय नेवसे, माधुरी महेश सुद्रिक रोहिणी राजेंद्र सोनमाळी, सारिका धनराज परहर, मनीषा अमोल गोरे या एकल महिला उपस्थित होत्या.

महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व एकल महिला व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिकांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या एकल महिलांमधून श्रीमती लंका श्रीराम पठाडे यांनी आपल्या जीवनाची संघर्ष कहाणी कथन केली. विधवापण काय असतं आणि मी कसे भोगत आले आहे याची कहाणी त्यांनी उपस्थितांना सांगितली. मुलींनो भरकटून जाऊ नका, परिस्थितीची जाणीव ठेवा. महिला म्हणून आपली पत आपणच विकसित करण्याचा सल्लाही त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. सारिका धनराज परहर यांनी दादा पाटील कॉलेज उपक्रमशील असल्याचे सांगितले. विधवा महिलांना पूर्वांगिनी म्हणून जगावे लागते. विधवांना घरापासूनच संघर्ष करावा लागतो. स्वतःला अबला न समजता सक्षम समजावे असा सल्ला दिला.

महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. जयश्री कांबळे यांनी आपल्या संघर्ष कहाणीचे वर्णन मांडले. उकिरडे मॅडम यांनीही विद्यार्थिनींना दृष्टांताद्वारे मोलाचा सल्ला दिला. कु. वैष्णवी गायकवाड व कु. प्रीती शिंदे यांनीही आपली जीवन कहाणी विशद केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले की, मुलीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मसन्मान असेल तर स्त्रीपणाचे सोने होते. समाज नेहमी तू स्त्री आहे, याची सातत्याने जाणीव करून देत असतो. वर्षभर महिला सक्षमीकरण व सबलीकरण केले पाहिजे. सर्वात प्रथम महानुभव पंथाचे चक्रधर स्वामी यांनी स्त्रीला पहिला सन्मान दिला. परिस्थितीतून धाडस निर्माण होते. अश्रू गोठवण्याची ताकद निर्माण करा. स्त्री सन्मानाची भुकेली असते. सन्मान मिळवायचा असेल तर सक्षम म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहा. निसर्गाने जगात सर्वात सुंदर निर्माण केलेली वस्तू म्हणजे स्त्री आहे. तिचा सन्मान केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बेबी खिलारे, सूत्रसंचालन कु. प्रज्ञा सरोदे हिने तर आभार डॉ. संगीता कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आशा कदम, डॉ.संगीता कुलकर्णी, डॉ.बेबी खिलारे यांनी परिश्रम घेतले