
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सीईटी व नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्रॅश कोर्सचे आयोजन दादा पाटील महाविद्यालयामध्ये करण्यात आलेले आहे. या क्रॅश कोर्सच्या उद्घाटनासाठी पुणे येथील नामवंत तज्ञ अभिजीत टिळेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
याप्रसंगी बोलताना अभिजीत टिळेकर म्हणाले की, मातृभाषा प्रभावीपणे बोलता आली पाहिजे. भाषेबाबत न्यूनगंड बाळगू नये. स्पर्धेच्या युगामध्ये शहरी विद्यार्थ्यांसोबत टिकण्यासाठी इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व निर्माण करा. इंग्रजी भाषेतून बोलण्याचा सराव करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करा. रिल्स पाहण्यापेक्षा ज्ञान देणारी पॉडकास्ट पहावीत. उत्तुंग स्वप्ने पाहत स्वप्न अंमलात येण्यासाठी प्रयत्न करा. नर्सिंग, मेडिकल, बी टेक, टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट आदि क्षेत्रांमधील करिअरच्या संधी त्यांनी यावेळी विशद केल्या.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, महाविद्यालयातील प्राध्यापकांसोबतच विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन नीट व सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या कोर्समधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येते. केंद्रीय सीईटी व नीट परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना सर्वोच्च गुण मिळावेत हाच उद्देश क्रॅश कोर्स घेण्यापाठीमागील असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी विज्ञान विभागप्रमुख प्रा. सुनील देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘केंद्रीय सीईटी व नीट’ क्रॅश कोर्सचे समन्वयक प्रा. प्रवीण घालमे, आभार प्रा. जयदीप खेतमाळीस यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सुलभा पवार व प्रा. मीना खेतमाळीस यांनी केले. या क्रॅश कोर्सला अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातूनही अनेक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत







