
कर्जत तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चापडगाव येथे दिनांक २ मे २०२६ रोजी १९९८ च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २८ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या जुन्या मित्रमैत्रिणींनी शाळेच्या आठवणींना उजाळा देत आनंद, आपुलकी आणि कृतज्ञतेचा सुंदर संगम अनुभवला.
या स्नेहमेळाव्यास त्या काळातील अनेक शिक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये परबत सर, राजपुरे सर, टापरे सर, खेतमाळीस सर, सपकाळ सर, कांबळे सर, गोलेकर सर, सोनवणे सर, फाळके सर, दिंडोरे सर, जाधव मामा आणि वाळुंजकर मामा यांचा समावेश होता. गुरुजनांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक स्पर्श लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला सर्वांनी अभिवादन केले. शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे औक्षण करून, फेटे बांधून तसेच खिशावर स्मृतिचिन्ह लावून मोठ्या सन्मानाने स्वागत करण्यात आले. २८ वर्षांनंतर एकमेकांना भेटताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
विशेष म्हणजे ७३ पैकी तब्बल ६९ माजी विद्यार्थी उपस्थित राहिले होते. तसेच दिवंगत चार विद्यार्थी आणि काही शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शाळेचा माजी विद्यार्थी आणि शिवव्याख्याते राहुल शिंदेगुरुजी चापडगावकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
यावेळी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपले पूर्ण नाव, गाव, शिक्षण आणि सध्या करत असलेल्या व्यवसायाची माहिती देत मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असल्याचे पाहून शिक्षकांनाही अभिमान वाटला. काही जण शिक्षक, उद्योगपती, इंजिनिअर, सैन्यदलातून निवृत्त होऊन व्यावसायिक, एलआयसी एजंट, शेतकरी, नोकरदार तर काही गृहिणी म्हणून कुटुंब सांभाळत असल्याचे समजले. आपल्या विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळवलेले पाहून “ज्ञानदानाचे खरे चीज झाले,” अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी SSC 1998 बॅचच्या वतीने शाळेला ५ सिलिंग फॅन आणि ५ सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणून देण्यात आले. हे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक केकाण सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दल जपलेली कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी याचे हे सुंदर उदाहरण ठरले.
त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल, नारळ आणि विठ्ठल मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. गुरुजनांचा सन्मान करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमानंतर सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण आणखी रंगतदार झाले. गदादे मेजर, आबा बागल सर, राहुल शिंदे सर तसेच विद्यार्थिनींमधून योगिता देवकर, उषा घनवट, तेजस्विनी निंबाळकर आणि रेखा वरडुळे यांनी मराठी गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विकास भांडवलकर आणि राहुल शिंदे सर यांनी सध्याच्या जीवनशैली, आरोग्य आणि सामाजिक मूल्यांवर मार्गदर्शन केले. राहुल शिंदे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर छोटेखानी प्रेरणादायी व्याख्यान देत उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थिनींना एकत्र आणण्याची जबाबदारी योगिता देवकर आणि तेजस्विनी निंबाळकर यांनी पार पाडली, तर विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी विकास भांडवलकर, आबा बागल सर, गणेश पवार, चिंतामणी रसाळ आणि राहुल शिंदे सर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या कार्याचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत, मैत्रीचे नवे बंध अधिक दृढ करत आणि भविष्यातही असेच स्नेहमेळावे आयोजित करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. तब्बल २८ वर्षांनंतर भरलेली ही “शाळा” प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी आठवण बनून राहणार आहे.
शब्दांकन- अमित रसाळ, गणेश खराडे






