
प्रतिनिधी :-प्रा.राजेंद्र खराडे
कर्जत तालुक्यातील करमनवाडी व परिसरामध्ये चार दिवसापासून अवकाळी पाऊस होत असल्याने सर्वत्र शेती जलमय झाली आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतामधील झाकलेले कांदेपण भिजून गेले आहेत. मका,कडवळ,कांदे,भुईमूग ही पिके भुईसपाट झाली आहेत. गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस येत असल्याने ओढे,नदी,विहिरी,नाले,रस्ते तुडुंब भरून वाहत आहेत.तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जमिनीचे बांध फुटून माती वाहून गेली आहे. चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.सततच्या पावसामुळे विजेचे खांब कोसळले आहेत त्यामुळे वीज राहत नाही.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकरी पूर्ण आर्थिक संकटात सापडला आहे तसेच शेतीमधील पेरणीपूर्व मशागती रखडल्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आला आहे.सततचा पाऊस थांबत नसल्याने शेतकरी वैतागला आहे.शासनाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होवू लागली आहे.






